महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत नराचा नारायण होण्याच्या अलौकिक उत्क्रांतीला गतिमान करीत सर्वसामान्याना सदाचरणाचा मार्ग दाखविणार्या संतांची थोर परंपरा होऊन गेली आहे. अतिशय घनघोर आक्रमणाच्या अंधकारमय काळातही लोकांची जीवन जगण्याची आस्था आणि मुल्यांवरची श्रद्धा कायम ठेवण्याचे महान कार्य संत परंपरेने केले आहे. संतांच्या वास्तव्याने पावन झालेल्या येथील विविध पुण्यपावन तीर्थ क्षेत्रांमध्ये नेवाशा जवळील दत्त देवस्थान देवगड हे एक अग्रगण्य देवस्थान ! अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या काठावर वसलेले हे देवस्थान म्हणजे भक्तांसाठी भूलोकावरचा शांतता, पावित्र्य आणि श्रद्धेचा जणू भव्यतम आविष्कारच ! पुण्यसलीला प्रवरा नदी ही अमृतवाहिनी समजली जाते. अगस्तीऋषींच्या तपोभूमीतून उगम पावलेली प्रवरा नेवासा येथे संत श्री ज्ञानेश्वरांच्या भक्तीसंवादाचा ठेवा सामावून घेत, दक्षिणगंगा गोदावरीशी एकरूप होते. समन्वयाच्या विशाल भारतीय संस्कृतीची प्रचीती देणारा हा गोदा प्रवरेचा अपूर्व संगम देवगडजवळच पहावयास मिळतो. असे हे देवगड आता सर्व भक्ति संप्रदायाचे आकर्षण बनले आहे. नेवाशापासून १४ कि.मी. अंतरावरील मुरमे गावाजवळ उंच ठिकाणावर वसलेले देवगड अतिशय विलोभनीय निसर्ग सौंदर्य, वळसा घालून जाणारी प्रवरा नदी अशा रम्य ठिकाणी हे देवस्थान आहे. या देवस्थानाचे कर्ते करविते महान तपस्वी आणि संत पू. किसनगिरी बाबा यांचे चरित्र भक्ताना प्रेरणा देणारे आहे. त्यांचीच प्रेरणा घेऊन सध्या हरिभक्तपरायण पू. भास्करगिरी बाबा यांना समाजभिमुख अशा सहज संवादातून, उपक्रमातून आणि विविध कार्यक्रमांतून देवगडला आध्यात्माचे, आत्मोन्नतीच्या चळवळीचे केंद्र बनविले आहे. स्वच्छ, समाधानी, हव्याहव्याशा वाटणाऱ्या शांततेचा आविष्कार म्हणजे देवस्थान असे चित्र देवगड येथे दिसते. भक्तांना भारतीय संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवीत असतानाच येथे स्वच्छता, निसर्गसौंदर्य याबरोबरच त्याग, तपश्चर्या आणि मानव कल्याणाच्या चिंतनाला धीरगंभीर असा सुगंध आहे. हा सुगंध पू. किसनगिरी बाबा आणि पू. भास्करगिरी बाबा यांना आपले जीवन समर्पित करून, चंदनासारखे झिजून निर्माण केला आहे. त्यांचे जीवनकार्य प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे.