गुरुदेव दत्त
किसनगिरी बाबा
सूचना : रात्री १० नंतर भक्तनिवास प्रवेश तसेच भोजनालय बंद राहील. | संपर्क - 7796203111 | अधिकृत संकेतस्थळ : gurudevdattapithdevgad.org
|| श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड - पर्यटन क्षेत्र ||
निसर्गरम्य
निसर्गाशी सख्य सांगणारा हा श्रीक्षेत्र देवगडचा निसर्गरम्य परिसर. अथक परिश्रमातून फुललेली इथली वनराई प्रयत्नवादाचे फळ सांगणारी आहे. हा सारा भव्य परिसर म्हणजे ‘सत्य संकल्पाचा दाता नारायण’ या श्री तुकोबांच्या उक्तीचा प्रत्यय देणारा. संत वास्तव्याने पावन झालेला हा परिसर आणि इथला निसर्ग भक्तीला सुगंध देणारा , मनाला उल्हास देणारा आणि एकाग्रतेला सूर देणारा आहे.
प्रवरा
संतांच्या वास्तव्याने क्षेत्रे निर्माण होतात. या क्षेत्रांना तीर्थाचे बळ लाभले की , ती तीर्थक्षेत्रे होतात. तीर्थांचा प्रवाह सतत पुढे जाण्याचा संदेश देतो आणि या पुढे जाण्याला उपकारक दिशा संतांच्या उपदेशातून मिळते. श्रीक्षेत्र देवगड असेच तीर्थक्षेत्र आहे. सद्गुरु किसनगिरी बाबांचा उपकारक उपदेश जनमानात रुजवणाऱ्या या क्षेत्राला प्रवरेचे पात्र भव्यता देते. प्रवरेवरचा दगडी घाट , नदी किनाऱ्यावरील वनराई , नौकाविहार करता येईल असे विस्तीर्ण पात्र आणि मंदिर परिसराशी मैत्री वाढवित मंदिराच्या पायथ्याजवळून जाणारा पवित्र प्रवरेचा प्रवाह हा अध्यात्म आणि निसर्गाचा अनोखा संगम देवगडला पाहता येतो. समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांची थोरवी गोदावरीला ऐकविण्यासाठी अधीर झालेली ही प्रवरा किसनगिरी बाबांचे दर्शन घेऊन तृप्तीचा अनुभव घेत मोठ् जोमाने पुढे धावते.
नौका विहार
पवित्र प्रवरेच्या विस्तीर्ण पात्रात श्रीक्षेत्र देवगड संस्थांच्या वतीने नावेची व्यवस्था केलेली आहे. भरपूर पाणी, संत सहवास, विस्तीर्ण वनराई आणि एकांत यामुळे येथे नौकाविहार करण्याचा मोह हा सर्वांनाच होतो अन संत सहवासात भवसागर पार केल्याचे समाधान भक्तांना या ठिकाणी मिळते